स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दिनांक २१/०८/२०२६
लातूर : विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधून सुरक्षितता, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने लातूर पोलीस विभागातर्फे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून दि. १ ऑगस्ट २०२६ पासून ‘पोलीस–विद्यार्थी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

दि. २० ऑगस्ट २०२६ पर्यंत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील २३ पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसना एकूण १५० भेटी देत तब्बल ४७,०८९ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे. विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने प्रश्न विचारावेत आणि पोलिसांशी सुसंवादाचे नाते निर्माण व्हावे, यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाची विशेष बाब म्हणजे पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्वतः तीन ठिकाणी भेटी देऊन तब्बल ७,८५० विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत.

*२० ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद.*
दि. २० ऑगस्ट रोजी उदगीर शहर पोलीस ठाणे हद्दीत सपोनि श्री. करवीर यांनी राष्ट्रीय विद्यालय येथे, तर पोउपनि श्री. केंद्रे यांनी अल अमीन उर्दू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कासार शिरशी पोलीस ठाणे हद्दीत सपोनि श्री. गर्जे यांनी लालबहादूर शास्त्री विद्यालय येथे संवाद साधला.
चाकूर पोलीस ठाणे हद्दीत नळेगाव येथील शिव जागृती वरिष्ठ प्रशाळेत पोउपनि श्री. चामले यांनी, औसा हद्दीत बोरफळ येथील जिल्हा परिषद शाळेत पोनि श्री. ढमाळे यांनी, तर मुरूड हद्दीत तांदूळजा येथील साई विद्यालयात सपोनि श्री. अंधारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रेणापूर पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात पोनि श्री. देढे, किल्लारी हद्दीत नादुर्गा येथील समता विद्यालयात सपोनि श्री. जाधव, अहमदपूर हद्दीत शिरूर ताजबंद येथील महेश विद्यालयात पोउपनि श्रीमती जाधव, गांधी चौक हद्दीत बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये पोउपनि श्रीमती रायपल्ले, तर विवेकानंद चौक हद्दीत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सपोनि श्री. उजगरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याचा हा उपक्रम यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असून, ‘सुरक्षित विद्यार्थी–सुरक्षित समाज’ या उद्देशाने लातूर पोलीस विभागाची जनजागृती मोहीम प्रभावीपणे सुरू राहणार आहे.

