स्मिता बाबरे (  मुख्य संपादिका  )

दि.22 / 08 / 2026

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत ₹५ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व तंबाखूसह त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी बलेनो कार जप्त करण्यात आली आहे.

               दि. २२ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईच्या अनुषंगाने वाढवणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना हाळी ते शिरूर ताजबंद मार्गावरून एका बलेनो कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन हाळी ते शिरूर ताजबंद रस्त्यावर सापळा रचला. काही वेळातच संशयित वर्णनाची एमएच-०५-डीएच-५२६६ क्रमांकाची बलेनो कार तेथे आली. पोलिसांनी कार थांबवून चालकास ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता कारच्या मागील सीटवर तसेच डिक्कीत पोत्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.

             जप्त मुद्देमालामध्ये विमल पान मसाला, व्ही-१ सुगंधित तंबाखूच्या बॅग एकूण १ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. तसेच गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली अंदाजे ४ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी बलेनो कार जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ५ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

             या प्रकरणी मुबीन सिद्दिख सय्यद, वय २९ वर्षे, रा. दर्गापूर, अहमदपूर, ता. अहमदपूर, जि. लातूर यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात कलम १२३, २७४, २७५, २२३ बी.एन.एस. अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

           ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या  नेतृत्वातील पथकामधील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार साहेबराव हाके, अर्जुन राजपूत, मनोज खोसे,आनंद हल्लाळे व प्रविण कोळसुरे यांनी केली आहे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *