रणजित दुपारगोडे   ( महाराष्ट्र प्रतिनिधी )
सोलापूर :  ( तळेहिप्परगा )अक्षय तृतीयेच्या शुभदिनी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे वादळाच्या जोरदार तडाख्यात घराचा काही भाग कोसळून १२ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, फरहान असलम कल्याणी (वय १२) हा मुलगा सायंकाळी साधारण साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान आपल्या घरात बसलेला होता. याचवेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्र्याचे शेड आणि लोखंडी अँगल कोसळून थेट त्याच्या डोक्यावर पडले. गंभीर दुखापत झाल्याने फरहानचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच अशी दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत फरहानचा मृत्यू झाला होता.

स्थानिक प्रशासन व पोलीस यांना घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे वादळामुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
गावकऱ्यांकडून शोक व्यक्त
फरहान हा शांत व मनमिळावू स्वभावाचा मुलगा असल्याचे सांगितले जात असून त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed