फिरोज सय्यद ( नांदेड जिल्हा प्रतिनिधी )
नांदेड : माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवा बजावलेले सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मकाजी राठोड हे नुकतेच सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय पोलीस सेवेला गौरविण्यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जोंधळे यांच्या पुढाकाराने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत राठोड यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे तसेच माहूरचे तहसीलदार तथा तालुका दंड अधिकारी अभिजित जगताप व सपोनि, संजय जोंधळे यांच्या हस्ते मकाजी राठोड आणि त्यांच्या पत्नीचा शाल, पुष्पगुच्छ, साडी चोळी व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले .
सिंदखेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सेवा बजावताना राठोड यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच विविध सामाजिक, धार्मिक उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नागरिकांशी सलोख्याचे संबंध ठेवून कर्तव्य बजावणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित या सत्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी राठोड यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारामुळे मकाजी राठोड व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
कार्यक्रमास पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
