स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दि.07/10/2026
लातूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या विविध सामाजिक समस्या आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १ ऑक्टोबरपासून आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल ५९ गावांना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला आहे.
कमी पावसामुळे निर्माण होणारी टंचाई, रोजगाराच्या संधींचा अभाव, स्थलांतर, आर्थिक अडचणी तसेच त्यातून उद्भवू शकणाऱ्या सामाजिक व कायदेशीर समस्या याबाबत गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. संभाव्य समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्यावर कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतील, तसेच पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि स्थानिक यंत्रणांच्या समन्वयातून या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जाता येईल, याबाबत संवाद साधला जात आहे.
या उपक्रमाला ग्रामीण भागातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये थेट संवादाचे प्रभावी व्यासपीठ निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील नागरिकांकडून स्थानिक समस्या, संभाव्य धोके आणि त्यावरील उपाययोजनांबाबत विविध सूचना मांडल्या जात असून, पोलिसांकडून त्यावर आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे.
*ग्रामसुरक्षा दलाची स्थापना*
‘पोलीस आपल्या गावामध्ये’ या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गावागावात ‘ग्रामसुरक्षा दल’ स्थापन करण्याची प्रक्रिया. गावातील होतकरू, जबाबदार, समाजाभिमुख आणि सकारात्मक कार्य करणाऱ्या तरुणांचा या ग्रामसुरक्षा दलामध्ये समावेश करण्यात येत आहे.
गावातील सुरक्षितता, सामाजिक सलोखा, नागरिकांमध्ये जनजागृती तसेच दुष्काळाच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य समस्यांवर प्रतिबंधात्मक पद्धतीने काम करण्यासाठी या तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ग्रामसुरक्षा दलातील सदस्य आणि पोलीस यांच्यात समन्वय ठेवून गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवणे व आवश्यकतेनुसार पोलिसांना माहिती देणे याबाबतही चर्चा करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून ‘पोलीस केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारे यंत्रणा नसून, अडचणीच्या काळात नागरिकांच्या सोबत उभे राहणारे सहकारी आहेत’, हा विश्वास ग्रामीण भागात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच पोलीस–ग्रामस्थ समन्वय अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.
