स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह सुमारे ७०० ब्रास वाळू साठा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
मांजरा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून त्याची वाहतूक व चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केल्याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशावर पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यामधील वाळूसह अंदाजे ७०० ब्रास वाळू साठा असा एकूण ४५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता मौजे शिरोळ येथील वेताळवाडी वस्ती परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी बाळासाहेब सूर्यकांत शिंदे व दयानंद किशन कज्जेवाड, दोघे रा. शिरोळ वां., ता. निलंगा, जि. लातूर हे मांजरा नदीपात्रातील वाळू विनापरवाना उपसा करून त्याची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान बाळासाहेब सूर्यकांत जाधव यांच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर व पिवळ्या रंगाची ट्रॉली, त्यामध्ये अंदाजे एक ब्रास वाळू असा ५ लाख ५ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच दयानंद कज्जेवाड यांच्या ताब्यातील लाल रंगाचा ट्रॅक्टर व पिवळ्या रंगाची ट्रॉली, त्यामध्ये अंदाजे अर्धा ब्रास वाळू असा ५ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय वेताळवाडी वस्ती येथील शाळेच्या बाजूस असलेल्या तळ्याजवळ अंदाजे ७०० ब्रास वाळूचा साठा आढळून आला. सदर वाळू नदीपात्रातून विनापरवाना उपसा करून साठवून ठेवण्यात आल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने, पंचांसमक्ष सदर वाळूसाठ्याची अंदाजे किंमत ३५ लाख निश्चित करण्यात आली.

अशाप्रकारे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यातील वाळू तसेच स्वतंत्रपणे आढळून आलेला अंदाजे ७०० ब्रास वाळूसाठा असा एकूण ₹४५,०७,५००/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.सदर प्रकरणी पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ येथे गु.र.नं. २८७/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच कलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी अक्षय जाधव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकामधील पोलीस अंमलदार श्रीराम सांडुर ,कैलास शिंदे, विलास अर्जुने, विकास लोखंडे यांनी केली यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यू. जी. रायबोळे करीत आहेत.
अवैध वाळू उपसा, वाहतूक व साठवणुकीविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अवैध वाळू व्यवसायावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
