स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

उदगीर  : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर उदगीर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत, शिस्तबद्ध आणि निर्विघ्नपणे पार पडाव्यात, यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६० तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३५, अशा एकूण ९५ गणेश मंडळांचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी  अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक मेघना मॅडम, ५ उपविभागीय पोलीस अधिकारी, ९ पोलीस निरीक्षक, ३९ पोलीस उपनिरीक्षक, ४१७ पोलीस अंमलदार तसेच २६६ होमगार्ड जवान असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याशिवाय एसआरपीएफच्या २ तुकड्या, १ शीघ्र कृती दल पथक, २ दंगल नियंत्रण पथके, १ दामिनी पथक, गोपनीय शाखेचे ५ अंमलदार, १ बॉम्बशोधक व नाशक पथक, १ दहशतवाद विरोधी पथक तसेच १ स्ट्राइकिंग फोर्स सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन वाहन व रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली आहे.

*संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे संचलन*

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास दृढ व्हावा, यासाठी उदगीर शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे तसेच मुख्य बाजारपेठेत पोलिसांचे संचलन घेण्यात आले. या संचलनातून पोलिसांची सज्जता व प्रभावी बंदोबस्ताचे दर्शन घडविण्यात आले.

*ड्रोनद्वारे नजर; सोशल मीडियावर सायबर सेलचे मॉनिटरिंग*

गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन, संवेदनशील ठिकाणांवरील हालचाली तसेच संपूर्ण परिसरावर ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर अफवा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांचा प्रसार होऊ नये, यासाठी सायबर सेलमार्फत सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यात येणार आहे.

गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून विसर्जन मिरवणुका शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद हालचाल, आक्षेपार्ह मजकूर किंवा समाजात तेढ निर्माण करणारी माहिती निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश विसर्जनाचा कार्यक्रम शांततामय आणि निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जिल्हा प्रशासन व लातूर जिल्हा पोलीस दल पूर्णपणे सज्ज असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत आहे, अशी माहिती उदगीर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बिरप्पा भुसनूर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed