संदिप रोमण ( पुरंदर ता. प्रतिनिधी )
पांडेश्वर : पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावच्या श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या लक्ष्मीआई मंदिराची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत या मंदिराच्या विकासासाठी शासकीय निधी मिळाला नसल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सन 1958-59 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून गावाच्या विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होत असताना, गावातील धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लक्ष्मीआई मंदिराच्या विकासाकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. मंदिराच्या सध्याच्या अवस्थेची छायाचित्रे पाहिल्यास परिस्थितीची तीव्रता स्पष्टपणे जाणवते.
मंदिराच्या जुन्या दगडी भिंतींना तडे गेलेले असून काही ठिकाणी बांधकामाची झीज झालेली आहे. छतावरील कौले व लाकडी आधार जीर्ण झाले असून अनेक ठिकाणी छतामधून सूर्यप्रकाश थेट आत येत आहे. पावसाळ्यात पाणी गळण्याची शक्यता निर्माण झाली असून मंदिराच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
*श्रद्धास्थान की दुर्लक्षित वास्तू*?
गावकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिराला मूलभूत डागडुजी, छताची दुरुस्ती, भिंतींचे संवर्धन, परिसर सुशोभीकरण आदी कामांची गरज आहे. मात्र आजपर्यंत मंदिर विकासासाठी कोणताही शासकीय निधी प्राप्त झालेला नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
एकीकडे गावातील नागरिक विविध धार्मिक सण-उत्सव श्रद्धेने साजरे करतात, तर दुसरीकडे त्याच श्रद्धास्थानाची वास्तू मात्र जीर्णावस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
