अजित काळेल ( सातारा जि. संपादक )
बेवनूर गावात वाढत्या मद्यप्राशनामुळे निर्माण होत असलेल्या सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर दारूबंदीची मागणी तीव्र झाली असून गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. गावाला दारूमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष बैठक घेऊन दारूबंदीचा ठराव मंजूर करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
बेकायदेशीरपणे चाललेलं धंदे सुद्धा सरपंच यांनी पुढाकार घेऊन बंद केले पाहिजेत मग यामध्ये त्यांच्या सहकार्यांमधली असली तरी त्याला कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे
गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीसह विविध बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. गावाच्या सामाजिक स्वास्थ्याला बाधा ठरणाऱ्या सर्व अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याशिवाय ग्रामपंचायत जागेवर अनधिकृतपणे गाळे उभारणे, झाडांची तोड करून व्यावसायिक वापरासाठी जागा विकसित करणे, तसेच इंदिरा वसाहतीत दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत नियमबाह्य बांधकामे उभारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या सर्व प्रकारांची चौकशी करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
दारूबंदीच्या या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर लोकसमर्थन मिळत असून “दारूमुक्त बेवनूर, सुखी बेवनूर” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गाव एकवटल्याचे चित्र दिसत आहे. गावाच्या विकासासाठी, कुटुंबांच्या सुख-समृद्धीसाठी आणि तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरपंचांची भूमिका
“गावातील तरुण पिढी व्यसनमुक्त राहावी, हीच आमची भूमिका आहे. दारूमुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून आता तरुण वर्गही व्यसनाच्या आहारी जात आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन पडून राहण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारूविक्री व बेकायदेशीर धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत. तसेच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवून ती नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत. गावहितासाठी आवश्यक ती कठोर भूमिका घेऊन संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणार असून कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.”
– सुभाष कांबळे, सरपंच, ग्रामपंचायत बेवनूर
दबावाला न झुकण्याचा निर्धार
“बेवनूरमध्ये दारूबंदीची चळवळ सुरू केल्यानंतर काही व्यक्तींनी दबाव टाकण्याचा आणि अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजहितासाठी सुरू केलेल्या या लढ्यातून मी मागे हटणार नाही. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून गावाच्या भविष्यासाठी आहे. दारूमुक्त व व्यसनमुक्त बेवनूर घडविण्याचा आमचा निर्धार कायम असून सर्व ग्रामस्थांनी कोणतेही राजकारण न करता या मोहिमेत सहभागी व्हावे.”
– अंकुश सरगर,
दारूबंदी मोहिमेचे पुढाकारकर्ते
“दारूमुक्त बेवनूरसाठी गाव एकवटले; आता ग्रामपंचायतीच्या निर्णायक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष”
