नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. 70281 92140
पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अलीकडे समोर आलेली बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. संबंधित वृत्तातून स्पष्ट होते की पीएमपीएल कर्मचाऱ्यांना मूलभूत विश्रांती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत आणि त्यांना पुलाच्या पायथ्याशी झोपण्याची वेळ येत आहे. ही बाब केवळ प्रशासनातील हलगर्जीपणाच नव्हे, तर माणुसकीला धक्का देणारी आहे.
ग्रामपंचायतीकडे आवश्यक साधनसामग्री आणि जागा उपलब्ध असतानाही कर्मचाऱ्यांसाठी सुविधा निर्माण न करणे, तसेच संबंधित इमारत बंद ठेवणे ही गंभीर बाब आहे. शासनाच्या स्पष्ट नियम आणि जीआरनुसार अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात पाटस येथे नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.
याचबरोबर, ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्यानंतर काही अतिक्रमणधारक व्यक्ती कारभारावर प्रभाव टाकत असल्याचेही समोर येत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे आणि अधिकृत प्रक्रियेत हस्तक्षेप करणे ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्यावतीने करण्यात येत आहे. या विषयाला वाचा फोडण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात उतरली असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.
जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकवला जाईल. तसेच समस्त गावकऱ्यांना सोबत घेऊन ग्रामपंचायत पाटस (ता. दौंड, जि. पुणे) समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची दखल प्रशासनाने घ्यावी.
असा इशारा अविनाश मोहिते, संभाजी ब्रिगेड पुणे, यांनी दिला आहे.
जय जिजाऊ, जय शिवराय!
