नेताजी खराडे ( दौंड तालुका प्रतिनिधी )
पडवी ( ता. दौंड ) : मुख्यमंत्री अभियान कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील पहिला ‘बोलका पशुवैद्यकीय दवाखाना’ म्हणून ओळख मिळवलेल्या पडवी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची माननीय गटविकास अधिकारी (BDO) यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सखोल आढावा घेतला. यावेळी ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे परीक्षण करण्यात आले.
या पाहणीदरम्यान पडवी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री अनिल बापू शितोळे, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रमोद अण्णा शितोळे, ग्रामपंचायत अधिकारी श्री कोळेकर साहेब, पिंटू शितोळे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. बांगर, श्री संजय कुंभार (परिचर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय बीडीओ यांनी दवाखान्यातील एकूण कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये दवाखान्याची स्वच्छता, परिसराचे सुशोभीकरण, नवीन वृक्षलागवड, तसेच तांत्रिक कामकाजाची तपासणी करण्यात आली. पशुधनासाठी दिल्या जाणाऱ्या औषधोपचार सेवा, लसीकरण मोहीम, कृत्रिम रेतन, खच्चीकरण आदी सेवा प्रभावीपणे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच पशुपालकांसाठी महत्त्वाची असलेली केसीसी (KCC) योजना सध्या सुरू आहे का, तिची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याचीही सखोल चौकशी करण्यात आली. या योजनेचा लाभ पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामकाजाबाबत माननीय बीडीओ यांनी समाधान व्यक्त करत, हा दवाखाना इतर गावांसाठी आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार काढले. ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग व स्थानिक प्रतिनिधींच्या समन्वयातून सुरू असलेले हे उपक्रम पशुपालकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पाहणीमुळे पडवी गावातील पशुपालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
