चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
दि. १३ ओडिशा राज्यातील कटक येथे पार पडलेल्या ३३ व्या ज्युनियर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत साताऱ्याचा महेश रवींद्र तेलतुंबडे याने ईपी (Epee) प्रकारात रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय क्रीडाविश्वाचे लक्ष वेधून घेतले.
वेगवान हालचाली, अचूक प्रतिहल्ले आणि जबरदस्त एकाग्रतेच्या जोरावर महेशने देशातील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना नमवत अंतिम फेरीत दमदार प्रदर्शन केले. हे यश केवळ एका स्पर्धेपुरते मर्यादित नसून महेशच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे प्रतीक ठरले आहे.
याआधी महेशने ज्युनियर स्टेटमध्ये ३ सुवर्ण, सीनियर स्टेटमध्ये ३ कांस्य पदके, तसेच खेलो इंडियामध्ये अव्वल कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
महेशच्या या यशामागे मुख्य प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. “महेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्याची पूर्ण क्षमता आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर उदय डोंगरे, अशोक दुधारे, काठोळे आणि सागर मगरे सरांचे मार्गदर्शनही महेशला लाभले.
वडील रवींद्र तेलतुंबडे (पोलीस अधिकारी) यांच्या शिस्तप्रिय संस्कारांत घडलेल्या महेशने अभ्यास आणि खेळ यांचा समतोल राखत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महेश म्हणाला, “आशियाई क्रीडा स्पर्धेत तिरंगा फडकवणे हेच माझे पुढील ध्येय आहे.”
साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून महेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छांचा सैल धबधबा उधळला जात आहे.
