चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
बोरगाव (शिरढोण) दि. १४ जानेवारी,ना सुरक्षा, ना आरोग्य, ना हक्क; अन्याय सहनशक्तीच्या पलीकडे आंदोलन अटळ!
अजित काळेल
टोल नाक्यांवरील कर्मचारी म्हणजे माणसं नाहीत का? असा संतप्त सवाल उपस्थित करत टोल चालक कंपनीकडून सुरू असलेल्या अमानुष, बेजबाबदार आणि कायद्याला हरताळ फासणाऱ्या कारभाराचा तीव्र निषेध महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे संपादक व संपूर्ण टीमने केला आहे. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या कंपनीची तात्काळ चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून टोल बंदसह तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खणखणीत इशारा देण्यात आला आहे.
अपघातप्रवण टोल नाक्यांवर काम करत असताना कर्मचाऱ्यांना प्रोटेक्शन शूज, रिफ्लेक्टिंग जॅकेट, आयडी कार्ड, ड्रेस कोड देणे ही कंपनीची जबाबदारी असताना ती जाणीवपूर्वक टाळली जात आहे. हा निष्काळजीपणा नसून कामगारांच्या जीवावर उठलेली थेट गुन्हेगारी वृत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह नाहीत, उपलब्ध सुविधाही दयनीय अवस्थेत आहेत. मूलभूत मानवी गरजांकडे डोळेझाक करून कंपनीने माणुसकीचाच खून केल्याचे चित्र आहे.
आर्थिक शोषण तर उघडपणे सुरू आहे. किमान वेतन नाकारले जाते, वेळेवर पगार दिला जात नाही, बोनस नाही, पगार स्लिपही दिली जात नाही. हा थेट कामगार कायद्याचा भंग असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्याच्या बाबतीत कंपनीची बेपर्वाई अंगावर काटा आणणारी आहे. सहा महिन्यांतून एकदाही आरोग्य तपासणी होत नाही, आरोग्य विमा काढलेला नाही. अपघात किंवा आजार झाल्यास कर्मचारी अक्षरशः वाऱ्यावर सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टोल नाक्यांवरील बसण्यासाठी खुर्च्यांचा अभाव, कर्मचाऱ्यांच्या खोल्यांमधील तुटलेली दरवाजे, उघडे व प्राणघातक वायरिंग यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. असा प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी टोल चालक कंपनी व संबंधित प्रशासनावर राहील, असा थेट इशारा देण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषी कंपनीवर कठोर कारवाई करावी, तसेच कर्मचाऱ्यांचे झालेले आर्थिक व मानसिक नुकसान वसूल करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास राज्यभर टोल बंद आंदोलन, रस्त्यावर उतरणे आणि तीव्र स्वरूपाची लढाई अटळ आहे, असा निर्णायक इशारा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 चे संपादक व सर्व टीमने दिला आहे.
