नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
दौंड : चौफुला येथील रेणुका कला केंद्रात १२ जून रोजी सुरू असलेल्या तमाशा कार्यक्रमादरम्यान रसिकांमध्ये झालेल्या वादाने गंभीर वळण घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रेक्षकांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही वेळातच चांगलाच पेटला आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
याच वादादरम्यान एका तरुणाकडे गावठी कट्टा (पिस्तूल) असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून तिघा संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. या कारवाईमुळे कला केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तासगावकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक माने आणि वागज यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधितांकडून माहिती घेतली.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तिघांविरोधात यवत पोलीस ठाण्यात नेमका कोणता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून शस्त्र बाळगण्यामागील कारण तसेच वादाचे नेमके स्वरूप काय होते, याचा शोध घेतला जात आहे.
तमाशा ही महाराष्ट्राची समृद्ध लोककला मानली जाते. मात्र अशा प्रकारच्या घटनांमुळे कला क्षेत्राची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत अधिकृत माहिती आणि पोलिसांचा तपास अहवाल समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
