गुलाब शेख ( उपसंपादक महाराष्ट्र राज्य  )

मुखेड (जि. नांदेड) या ग्रामीण व मागास भागातून उभे राहिलेले, शेतकरी–शेतमजुरांच्या जिवासाठी अखंड झटणारे सर्पदंश उपचार क्षेत्रातील अग्रणी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिलीप पांडुरंगराव पुंडे यांना 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनाकडून ‘रिसेप्शन ॲट होम’ या विशेष कार्यक्रमासाठी सन्मानाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
देशभरातून केवळ 11 डॉक्टरांची निवड करण्यात आली असून, ग्रामीण भागात तब्बल 38 वर्षे सर्पदंशविरोधात चालवलेल्या मानवतावादी लढ्याची ही राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे.

हे सन्मानाचे निमंत्रण राष्ट्रपती भवनामार्फत पाठविण्यात आले असून, नांदेड मुख्य पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री. अरुण गायकवाड व त्यांच्या विशेष पथकाने तसेच मुखेड पोस्ट कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून डॉ. दिलीप पुंडे व सौ. माला पुंडे यांना सन्मानपूर्वक निमंत्रण सुपूर्त केले.
सदर समारंभ सोमवार, दि. 26 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे होणार आहे.

डॉ. दिलीप पुंडे हे गेल्या 38 वर्षांपासून ‘सेवा हीच साधना’ या आंबेडकरी तत्त्वज्ञानातून ग्रामीण भागात आरोग्यसेवा देत आहेत. 1988 ते 1997 या कालावधीत त्यांनी ग्रामीण रुग्णालय, मुखेड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. 1997 पासून ते पुंडे हॉस्पिटल, मुखेड येथे कार्यरत असून, आजपर्यंत त्यांनी लाखो गरिब, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.
विशेष म्हणजे, त्यांनी सर्पदंशाच्या 10 हजारांहून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

1988 साली या भागात सर्पदंशामुळे मृत्यूदर सुमारे 25 टक्के होता. मात्र डॉ. पुंडे यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून, वेळेवर उपचार व जनजागृतीच्या माध्यमातून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 2024–25 पर्यंत हा मृत्यूदर शून्य टक्क्यांपर्यंत आणण्यात यश आले आहे. ही केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिक क्रांती आहे.

2015 साली त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘सर्पदंशाविरुद्ध युद्ध’ या विषयावर व्याख्यान दिले. आजपर्यंत त्यांनी 5 लाखांहून अधिक नागरिकांमध्ये मोफत जनजागृती केली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकांमध्ये त्यांचे 10 शोधनिबंध प्रकाशित झाले असून, अनेक वैद्यकीय परिषदांमध्ये त्यांनी सर्पदंशावर प्रभावी व्याख्याने दिली आहेत.

ते राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समिती, राष्ट्रीय सर्पदंश कृती आराखडा समिती तसेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) सर्पदंश तज्ज्ञ समितीचे सदस्य आहेत. सध्या पुंडे हॉस्पिटल हे ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) मान्यताप्राप्त केंद्र म्हणून कार्यरत आहे.

या सन्मानाबाबत बोलताना डॉ. दिलीप पुंडे यांनी अत्यंत नम्र शब्दांत सांगितले,

> “हा सन्मान माझा एकट्याचा नसून माझे दिवंगत आई-वडील (कै. भीमाबाई व कै. पांडुरंगराव पुंडे), पत्नी सौ. माला पुंडे, सर्व गुरुजन, पुंडे हॉस्पिटलचे कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे हजारो रुग्ण यांचा आहे.”



ते पुढे म्हणाले की, सर्पदंश हा शेतकरी व शेतमजुरांवर येणारा आकस्मिक मृत्यूचा घाव असून, वेळेवर उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरतो. भारतात दरवर्षी एक लाखांहून अधिक मृत्यू सर्पदंशामुळे होतात.
2030 पर्यंत सर्पदंशामुळे होणारे मृत्यू 50 टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले असून, त्या दिशेने विविध उपक्रम सुरू आहेत.

> “शेतकरी, शेतमजूर व सर्पदंशग्रस्त रुग्णांच्या वेदनेची संवेदना थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली, ही बाब सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देणारी आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.



मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांच्या या ऐतिहासिक सन्मानामुळे ग्रामीण भागातील सेवाभावी डॉक्टर, शेतकरी समाज व कष्टकरी जनतेचा आत्मविश्वास उंचावला असून, संपूर्ण मुखेड तालुक्याचा अभिमान अधिकच वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *