चांगदेव काळेल ( सातारा जिल्हा संपादक )
भुईंज : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत भुईंज पोलीस ठाण्याने केवळ ध्वजारोहणापुरता सण न साजरा करता, समाजासाठी थेट उपयोगी ठरणारा आदर्श उपक्रम राबवून प्रशासनाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे यांच्या पुढाकारातून २६ जानेवारी २०२६ रोजी भुईंज पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात तब्बल २२ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “रक्तदान हेच खरे राष्ट्रसेवेचे प्रतीक” असल्याचे दाखवून दिले. कायदा-सुव्यवस्थेपुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू घटकांसाठी हात पुढे करणारी भुईंज पोलीस ठाण्याची ही भूमिका निश्चितच कौतुकास्पद ठरली.
या उपक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभागाचे श्री. सुनील साळुंखे यांनी विशेष भेट देत रक्तदाते व आयोजकांचे मनापासून कौतुक केले. तसेच भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील २० पोलीस पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री. साळुंखे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. हा सन्मान म्हणजे प्रामाणिक सेवा आणि जबाबदारीची पोचपावतीच ठरली.
या संपूर्ण उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिनाला सामाजिक जाणिवेची, सेवाभावाची आणि सकारात्मक प्रशासनाची नवी ओळख मिळाली. भुईंज पोलीस ठाण्याचा हा उपक्रम राज्यभर कौतुकाचा विषय ठरत असून, इतर पोलीस ठाण्यांसाठी तो नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
