इम्रान तांबोळी ( पंढरपूर तालुका प्रतिनिधी )
पंढरपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर नगरीत माघी वारीच्या निमित्ताने यंदा स्वच्छता, सुविधा आणि नियोजनाचा आदर्श नमुना पाहायला मिळत आहे. पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे शहराचे एकूण चित्रच बदलून गेले असून पंढरपूर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुंदर आणि भक्तस्नेही तीर्थक्षेत्र म्हणून भाविकांच्या मनात ठसा उमटवत आहे.
माघी वारीदरम्यान पंढरपूरमध्ये लाखो वारकरी व भाविक दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत दिंडी मुक्कामाच्या सर्व ठिकाणी नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या शुद्ध पाण्याची मुबलक सोय, स्वच्छ शौचालये तसेच सार्वजनिक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविली. दिंडी स्थळांपासून ते प्रमुख रस्ते, घाट परिसर, कॉलेज परिसर आणि सार्वजनिक इमारतींपर्यंत स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले.
याशिवाय वारकरी व भाविकांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था, नळपाणी पुरवठा सुरळीत ठेवणे, तसेच स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारी व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. शहरातील विविध भागात सातत्याने पाहणी करून तात्काळ उपाययोजना करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महेश रोकडे साहेबांनी मुख्याधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रशासनात शिस्त, कामात पारदर्शकता आणि निर्णयक्षमतेचा अनुभव नागरिकांना येत आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेली अनेक ठिकाणे आता स्वच्छ व सुस्थितीत दिसून येत असून पंढरपूर शहराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. त्यामुळे “पंढरपूर हे खरोखरच तीर्थक्षेत्र आहे” अशी भावना भाविक व वारकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
माघी वारीच्या यशस्वी नियोजनामुळे नगरपरिषद प्रशासनाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिक, वारकरी व विविध सामाजिक संघटनांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी काळातही अशीच नियोजनबद्ध व लोकाभिमुख कामे सुरू राहावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




