शेतकऱ्यांच्या मोटार चोरीचा भुईंज पोलिसांकडून पर्दाफाश; दोन आरोपी जेरबंद, २.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा संपादक अजित काळेल
दि. १३ : शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी करणाऱ्या टोळीचा भुईंज पोलिसांनी ग्रामसुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उडतारे (ता. वाई) येथील खडकी रोड परिसरातून शेतकऱ्याची पाण्याची मोटार चोरी झाल्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने गावात गस्त वाढवली. दरम्यान जांब येथील ग्रामसुरक्षा दलाने दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीत त्यांनी मोटार चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून ६ इलेक्ट्रिक मोटारी, तांब्याच्या तारा, मोटारसायकल व मोटार उघडण्याचे साहित्य असा एकूण २.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिपक संतोष मोरे (वय २६) व रुपेश संतोष मोरे (वय २०), रा. कळंबे, ता. वाई यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.उ.नि. पतंग पाटील, सुरज शिंदे तसेच भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल या पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.



