स्मिता बाबरे (  मुख्य संपादिका )

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर आज नसरापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला. “आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आरोपीला आमच्या ताब्यात द्या,” असा आक्रमक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या मागणीमुळे गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले आहे.

दरम्यान, संतप्त नागरिकांनी मुंबई-सातारा महामार्ग पुण्याजवळ दोन्ही बाजूंनी रोखून धरला. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असला तरी काही ठिकाणी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणातील आरोपीचा फोटोही आता समोर आला असून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. सर्व स्तरांतून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
   

प्रशासनाची भूमिका काय? पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
   

समाजमन सुन्न करणारी घटना या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. निष्पाप जीवावर झालेल्या या अत्याचाराने समाजमन सुन्न झाले असून नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *