अजित काळेल  ( सातारा जि. संपादक )

पाटण :  (धामणी )पाटण तालुक्यातील धामणी परिसरात अवैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

निवेदनानुसार, धामणी येथील काही व्यक्तींकडून गेल्या अनेक वर्षांपासून गोवा राज्यातून बनावट बिअर, देशी दारू व इतर मद्य मोठ्या प्रमाणावर आणून करपेवाडी, आरडे, बाबरवाडी, मस्करवाडी, राणेवाडी आदी गावांमध्ये अवैधरित्या विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, या बेकायदेशीर धंद्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करून दुचाकीवरून दारूची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

संबंधितांकडे कोणताही परवाना नसताना खुलेआम विक्री सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही बाब अनेक वेळा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारांच्या जोरावर हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आयु. उत्तम यदुनाथ भालेराव यांनी दिलेल्या निवेदनात, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी व अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

चौकट

“जिल्ह्यात कोणताही अवैध व्यवसाय चालू देणार नाही. संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी व आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल.”
— जिल्हा पोलीस अधीक्षक, सातारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *