पंकज सरोदे  ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

पुणे :  ता. १० : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे धानोरी येथील सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षक काँग्रेस वडगांवशेरीचे अध्यक्ष विजय रुपलाल श्रीवास्तव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोथरूड येथील एम.ई.एस. ऑडिटोरियममध्ये प्राईम टायकून मीडिया यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्राईम टायकून मीडियाचे सीईओ निलेश साबे, बाबासाहेब दिघे, नवनाथशेठ येवले तसेच जयश्री तायडे यांच्या हस्ते विजय श्रीवास्तव यांचा शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षण, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विजय श्रीवास्तव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, शिस्त, संस्कार आणि सामाजिक जाणीवा रुजविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले असून पालक आणि शाळा यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाबरोबरच संस्कारयुक्त शिक्षण देण्याच्या त्यांच्या ध्येयवादी कार्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष अनुराग पाटील, संस्थापिका तथा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या पाटील, शिक्षक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष सचिन दुर्गाडे, शिक्षक पुणे शहर अध्यक्ष धोंडिबा तरटे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजय श्रीवास्तव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *