नेताजी खराडे (  क्राईम रिपोर्टर  )

मो.नं. :  70281 92140

पुणे  (वरवंड ) : सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला (PHC) सध्या एका अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराचे ग्रहण लागले आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता तोडमल यांनी शासकीय नियमांना हरताळ फासत चक्क स्वतःच्या मर्जीने ‘बकरी ईद’च्या सुट्ट्यांचे वेळापत्रक बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अजब आणि बेजबाबदार कारभारामुळे लांबून आलेल्या गरीब रुग्णांची मोठी हेळसांड झाली असून, परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  

शासकीय आदेशानुसार गुरुवारी ‘बकरी ईद’ची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असताना, डॉ. तोडमल यांनी नियमांना बगल देत बुधवारीच दवाखाना बंद ठेवून सुट्टी साजरी केली. या मनमानी कारभाराची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच आपली चूक लपवण्यासाठी त्यांनी घाईघाईने ओपीडी सुरू केली. मात्र, तोपर्यंत उपचारासाठी लांबून आलेल्या अनेक रुग्णांना रिकाम्या हाताने आणि आजार अंगावर काढत परत जावे लागले होते.
  

कळस म्हणजे, स्वतःची चूक सुधारण्याऐवजी डॉ. तोडमल यांनी गुरुवारी शासनाचा अधिकृत सुट्टीचा आदेश धुडकावून लावत दवाखाना सुरू ठेवला. ‘बाजाराचा दिवस आहे, पेशंट जास्त येतील’ असे उफराटे समर्थन त्यांनी यावर केले. मात्र, प्रत्यक्षात सणासुदीमुळे गुरुवारी रुग्ण फिरकलेच नाहीत. त्यामुळे शासकीय आदेश डावलून सुट्टीचा वार बदलण्याचा अधिकार डॉ. तोडमल यांना दिला कोणी? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या अक्षम्य चुकीबद्दल त्यांनी वरिष्ठांना साधे लेखी कळवण्याची तसदीही घेतली नाही.
  

डॉ. तोडमल यांच्याविरोधात रुग्णांच्या तक्रारींचा पाढा इथेच संपत नाही. शासकीय नियमांनुसार वैद्यकीय अधिकाऱ्याने मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना, डॉ. तोडमल या पुण्यात राहत असून दवाखान्यात केवळ ‘क्वचितच’ दर्शन देतात, असा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

“फुकटचा शासकीय पगार उचलणाऱ्या या अधिकाऱ्याला जनतेच्या आरोग्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. कर्तव्यापेक्षा त्यांना स्वतःची वैयक्तिक कामेच जास्त महत्त्वाची वाटतात,” अशा कडक शब्दांत रुग्णांच्या नातेवाईकांनी आपला संताप व्यक्त केला.

   ‘आपण म्हणजेच प्रशासन’ आणि ‘आपल्या मर्जीने काहीही करू शकतो’ अशा उद्दाम वृत्तीने सध्या वरवंड आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. या प्रकरणाची जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशा कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक प्रशासकीय कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *