नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
पुणे : दौंड तालुका ( वरवंड ): महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या अधिकृत सार्वजनिक सुट्ट्यांच्या आदेशाला थेट बगल देत, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता तोडमल यांनी स्वतःच्या मर्जीने बुधवारी सुट्टी जाहीर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाचा स्पष्ट आदेश डावलून थेट प्रशासनाचा अपमान करणाऱ्या या अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई व्हावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिकृत राजपत्रानुसार, सन २०२६ मधील ‘बकरी ईद’ची अधिकृत सार्वजनिक सुट्टी २८ मे २०२६, म्हणजेच गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातील सर्व शासकीय कार्यालये या आदेशानुसार गुरुवारी सुट्टी पाळणार आहेत.
राज्याचा कायदा आणि शासकीय आदेश सर्वोच्च असताना, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र डॉ. योगिता तोडमल यांनी शासनाचा नियम धाब्यावर बसवून थेट बुधवारी सुट्टी जाहीर केली. यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
• सर्व शासकीय कार्यालये गुरुवारी सुट्टी पाळणार असताना, फक्त याच आरोग्य केंद्रात बुधवारी सुट्टी का दिली गेली?
• शासकीय आदेश डावलून स्वतःची मनमानी चालवणाऱ्या डॉ. योगिता तोडमल शासनापेक्षा मोठ्या आहेत का?
• या विशिष्ट दिवशी डॉ. तोडमल यांचे काही वैयक्तिक नियोजन किंवा खाजगी काम आहे का, ज्यासाठी त्यांनी थेट शासकीय सुट्टीचा दिवसच बदलून टाकला?
प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. अशा संवेदनशील ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून स्वतःचे नियम लागू करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळे शासनाच्या शिस्तीला हरताळ फासला जात आहे. या प्रकाराची वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या डॉ. योगिता तोडमल यांच्यावर तातडीने कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
दर बुधवारी गरोदर महिलांची तपासणी असते. यावेळी लांबून महिला तपासणी करण्यासाठी येत असतात. मात्र डॉ. तोडमल यांच्या मनमानीपणामुळे त्यांना विना तपासणी माघारी जावे लागते. त्यामुळे अशा अवघड अवस्थेत त्यांचा विनाकारण हेलपाटा होतो.
