नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं.70281 92140

वरवंड, ( ता. दौंड ): सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी कार्यरत असलेल्या वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील (PHC) कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे अनेक रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या सार्वजनिक सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत स्पष्टता नसल्याने उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागला. दूरवरून आलेल्या नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य व्यवस्थेच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सुट्टीचे नियोजन आणि आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत योग्य माहिती उपलब्ध न झाल्याने रुग्णांची गैरसोय झाली. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून यावे लागते. अशा परिस्थितीत आरोग्य केंद्र बंद असल्याचे आढळल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याशिवाय, आरोग्य केंद्रातील उपस्थिती आणि नियमित सेवा याबाबतही काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयात राहून नागरिकांना तत्पर सेवा देणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात सेवांमध्ये सातत्य नसल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हेच आरोग्यसेवेचे पहिले केंद्र असते. त्यामुळे अशा ठिकाणी सेवा अखंडित, पारदर्शक आणि नियमानुसार मिळणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी तसेच भविष्यात अशा प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे वरवंड परिसरात चर्चा रंगली असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. आरोग्य सेवेबाबत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *