अजित काळेल ( सातारा जि.संपादक )
सातारा : जन्म होताच नियतीने आयुष्यातला पहिला घाव घालून जन्मतः
संघर्षाची सुरुवात केली. बाळाच्या रडण्याच्या आवाजासोबतच घरात आक्रोश पसरला.
जन्मताच आईचे छत्र हरपलेला तो चिमुकला म्हणजे कुंडलिक. पण नियतीने हिरावून घेतलेल्या मायेची जागा त्याने आपल्या कर्तृत्वाने भरून काढलीय.काल तोच कुंडलिक महाराष्ट्र पोलिस झाला ही बातमी समजताच मन अगदी भरुन आलं..
वडिलांच्याकडील परिस्थिती पण बेताचीच.आईचे दुध काय असते हे त्याला कधी कळलेच नाही.आईच्या माघारी आज्जी आजोबांनी जमेल तशी माया केली, त्याला तळ शहाताच्या फोडाप्रमाणे चांगलं वाढवलं,जोपासलं आणि घडवलं..
पण म्हणतात ना,
“स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी”..!
आईची जागा कोणच भरू शकत नव्हतं. शाळेच्या दप्तराला आईने घासून-पुसून दिलेला डबा नसावा याची खंत त्याला कायम असावी.पण आई विना वाढलेल्या कुंडलिक मध्ये
आईच्या संस्कारांची कमतरता तीळमात्र सुद्धा कधीच जाणवत नव्हती.”बाळाचे पाय पाळण्यात दिसतात” या उक्तीप्रमाणे त्याच्यामध्ये असणारा ‘नम्रपणा’ हा रोजच्या जगण्यात ठळकपणे जाणवायचा.
पण याच उणेपणाने त्याला बळ दिले. “आई नाही म्हणून रडत बसायचं नाही, तर तिचं नाव मोठं करायचं” ही जिद्द त्याने लहानपणीच मनात पक्की केली असावी.
कैक पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजात एखादा अनाथ मुलगा पोलीस अधिकारी झाल्यानंतर आम्हा समाज बांधवांचे काळीज सुपा एवढं होणारच ना..?
नियतीन जरी कुंडलिक वर अन्याय केला असला तरी कुंडलिक पोलीस झाल्याचे बातमी समाजताच समाजाबरोबरही गावकऱ्यांचं मन अगदी भरून आलं अन् पुंडलिक ची मिरवणूक काढण्यासाठी शेकडो समाज बांधव पुढे आले.
त्या मिरवणुकी दरम्यान एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली,
तुझी जिद्द तुझा संघर्ष अभिमानास्पद तर आहेच..!
पण त्याहुनही ठळकपणे जाणवले ते म्हणजे “लढाऊ असणारा “डी एन ए” कधीच परिस्थितीच भांडवल करत नाही अथवा प्रदर्शन करत नाही तर तो “लढतो, धडपडतो,आणि परिस्थितीच्या छातीवर पाय ठेवून जिंकतो सुद्धा..!”
“आपोआप काहीच घडत नसतं, त्यासाठी आपण केलेल्या कर्मांची अन् वाड-वडिलांच्या निःस्वार्थ पुण्याईची देणगी असावी लागते..”!
बा,बाळुमामा तुला उदंड आयुष्य देवो..!
ज्या मातीनं वाढवलं,घडवलं त्या मातीसाठी तुझ्या हातून दररोज सत्कर्म घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो..!
