नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

खुटबाव : दौंड तालुक्यातील खुटबाव येथील गलांडवाडी परिसरात असणाऱ्या एका गुऱ्हाळघरावर प्लास्टिक आणि रबरचा सर्रासपणे वापर केला जात असून, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या गंभीर बाबीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे (MPCB) अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
  

अलीकडेच अन्न आणि औषध प्रशासनाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुऱ्हाळघरांमध्ये गुळाच्या प्रक्रियेत बेकायदेशीररी्या वापरल्या जाणाऱ्या साखरेवर कडक बंदी घातलेली असतानाही, या संबंधित गुऱ्हाळघरात काही प्रमाणात साखर आढळून आली आहे. प्लास्टिक, रबरचे ज्वलन आणि साखरेची भेसळ यामुळे आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे उघड झाले आहे.
  

या बेकायदेशीर प्रकाराचे वृत्त संकलन करण्यासाठी आणि वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तिथे अत्यंत हिंसक अनुभवाला सामोरे जावे लागले. संबंधित गुऱ्हाळ चालक सचिन राऊत याने पत्रकारांवर थेट दादागिरी करत त्यांच्या दुचाकीची किल्ली जबरदस्तीने ओढून घेतली. एवढेच नव्हे तर, पत्रकारांच्या अंगावर धावून जात, “तुमचा इथं काय संबंध? तुम्ही गुऱ्हाळाची तपासणी करणारे कोण? आणि प्लास्टिक वापराबद्दल आम्हाला सांगणारे कोण?” अशा उद्दाम भाषेत दमदाटी करून पत्रकारांना धक्काबुक्की केली.
  

माजी आमदार रमेश थोरात यांच्या खुटबाव परिसरात जर गुऱ्हाळ चालक भरदिवसा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर म्हणजेच पत्रकारांवर अशी दमदाटी आणि मुजोरी करत असतील, तर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांना नक्की कोणाचा राज्याश्रय लाभला आहे? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


  

प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणाऱ्या अशा मुजोर गुऱ्हाळ चालकावर पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (MPCB) या गलांडवाडी येथील गुऱ्हाळघराची तातडीने पाहणी करून, प्लास्टिक-रबरच्या बेकायदेशीर वापराबद्दल आणि प्रदूषणाबद्दल सदर गुऱ्हाळघर कायमस्वरूपी बंद करावे, अशी जोरदार मागणी पंचक्रोशीतील नागरिक आणि पत्रकार संघटनांमधून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed