सुर्यकांत घार्गे  ( सातारा जिल्हा प्रतिनिधी )

खटाव  ( तालुका )  : गुरसाळे गावातील शेरे वस्तीतील एका रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे लेखी निवेदन देत रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावातील वस्तीपर्यंत जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून डांबरीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा येत्या काळात तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते आणि रस्त्याचे काम किती लवकर सुरू होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed