नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
पाटस (ता. दौंड) : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील पाटस टोल नाका परिसरात महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमण करण्यात आले असून, या ठिकाणी सुमारे ३० अनधिकृत व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. या गाळ्यांमध्ये हॉटेल,चहाच्या टपऱ्या, नाश्त्याची दुकाने, मोबाईल दुकाने चायनीज हॉटेल, फळ विक्रेते, तसेच इतर विविध अनाधिकृत व्यवसाय सुरू असून, संबंधितांकडून दरमहा ₹१८ ते ₹२० हजारांपर्यंत भाडे आकारले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
या अनधिकृत अतिक्रमणामुळे महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. त्यामुळे पुणेहून सोलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना सतत अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडी, अपघात तसेच जीवितहानीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

संभाजी ब्रिगेड, पुणे यांच्या वतीने या गंभीर प्रश्नाबाबत संबंधित टोल प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग NHAI प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे पाटस टोल नाका परिसरातील सर्व अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना अविनाश मोहिते म्हणाले, “पुणे–सोलापूर महामार्गावरील वरवंड परिसरात प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. त्याच धर्तीवर पाटस टोल नाका परिसरातील महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत गाळेही तात्काळ हटविण्यात यावेत. कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे कोणालाही अभय देऊ नये.” ते पुढे म्हणाले, “या अतिक्रमणाकडे इतक्या वर्षांपासून दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून, या प्रकारास जबाबदार आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

तसेच अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करावी.” अविनाश मोहिते यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “जर पाटस टोल नाका परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.”
यावेळी अविनाश मोहिते, सूर्यकांत सुतार, मिथुन चव्हाण, शिवाजी राजे साळुंखे, शंकर पवार, मच्छिंद्र ठोंबरे, इम्रान खान आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
