स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
दि. २१ ऑगस्ट २०२६
शेळी चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; २१ गुन्हे उघडकीस, १७.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.*
लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतशिवार व घरासमोरील शेळ्या चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.आरोपींकडून ११ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम, चोरीसाठी वापरण्यात आलेला छोटा टेम्पो व मोटारसायकल असा एकूण १७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शेळी चोरीचे तब्बल २१ गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली आहे.
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेत असताना, चाकूर परिसरात एका टोळीतील सदस्य चोरीच्या शेळ्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीची तातडीने पडताळणी करून पोलिसांनी पंचांसह शिरूर ताजबंद ते चाकूर रोडवरील चापोली येथील पांडुरंग हॉटेलसमोर सापळा रचला.
यावेळी संशयितरित्या छोट्या टेम्पो व मोटारसायकलसह थांबलेल्या दोन इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे
१) कैलास राम वळींग्रे (वय २५, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर)
२) बालाजी खंडु माने (वय ५४, रा. वडर गल्ली, देवणी)
अशी निष्पन्न झाली. पंचासमक्ष झडती घेतली असता टेम्पोमध्ये ११ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत आरोपींनी त्यांचे फरार साथीदार अमोल गिरधारी गुंजरगे (वय २६, रा. शिरूर ताजबंद) व आत्माराम उर्फ पप्पू माधवराव जाधव (वय ४०, रा. निडेबन, उदगीर) यांच्या साथीने लातूर जिल्ह्यातील विविध गावांच्या शिवारातून व घरासमोरून शेळ्या चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या शेळ्यांची विक्री करून मिळालेली रक्कमच पोलिसांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
आरोपींच्या कबुलीजबाबावरून व पोलीस अभिलेखाच्या पडताळणीत पोलीस ठाणे अहमदपूर–३, चाकूर–४, औसा–१, लातूर ग्रामीण–२, वाढवणा–३, रेणापूर–१, देवणी–२, निलंगा–१, किनगाव–२ आणि भादा–२, असे एकूण २१ गुन्हे या कारवाईत निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे या टोळीने जिल्ह्यातील अनेक भागांत सातत्याने शेळी चोरी करून पशुपालक व शेतकऱ्यांना आर्थिक फटका दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत ११ लाख ७५ हजार रुपये रोख, KA-46-6392 क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा छोटा टेम्पो (अंदाजे किंमत ५ लाख रुपये) आणि MH-24-BV-4813 क्रमांकाची बजाज पल्सर मोटारसायकल (अंदाजे किंमत १ लाख रुपये) असा एकूण १७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या शेळी चोरीच्या २१ गुन्ह्यांचा तपास पुढे नेण्यास महत्त्वपूर्ण धागेदोरे मिळाले असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास व कारवाई सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस स्टेशन अहमदपूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद म्हेत्रेवार यांच्या नेतृत्वातील पथकामधील सपोनि पांडुरंग माने, पोउपनि अमर केंद्रे, पोलीस अंमलदार संजय कांबळे, तुळशीराम गोविंद बरुरे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुटेवाड, प्रेमदास राठोड, गोविंद यलमटे, राजेश कंचे, विजय पाटील, माधव सारूळे, आत्माराम अंबिलवाड, अंजली गायकवाड, चंद्रकांत केंद्रे, शैलेश सुडे, रामदास बाचीफळे, हरी पतंगे यांनी केली आहे.
*पोलीसांचे आवाहन.*
शेतकरी व पशुपालकांनी आपल्या शेळ्या, मेंढ्या व इतर पशुधनाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रात्रीच्या वेळी विशेष दक्षता घ्यावी. पशुधन चोरीस गेल्यास विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. नागरिकांकडून मिळणारी तत्पर माहिती अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अत्यंत उपयुक्त ठरते.
