नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो. नं. 70281 92140
बोरीपार्धी, ता. दौंड : आकर्षक वेशभूषा, आत्मविश्वासाची पावले आणि विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजसेवक शिवाजीराव जेधे इंग्लिश मीडियम स्कूलचा परिसर फॅशनच्या रंगात रंगून गेला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्त्व विकासाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विविध आकर्षक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी रॅम्पवर आत्मविश्वासाने प्रवेश करत आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषेसह विविध संकल्पनांवर आधारित पोशाख सादर करत विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेची सुंदर झलक दाखवली.
विद्यार्थ्यांचे हावभाव, चालण्याची शैली, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण यांना उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा अंदाज आणि उत्साह यामुळे फॅशन शोला विशेष रंगत आली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सर्जनशीलता, व्यक्तिमत्त्व विकास आणि सादरीकरण कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली.
यावेळी प्राचार्या सौ. देवयानी तापकीर मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, असे सांगितले.
समन्वयक सौ. नीता हंडाळ-टेंगले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा फॅशन शो रंगतदार आणि अविस्मरणीय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.
