नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. :
यवत, पुणे ग्रामीण
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध यवत पोलिसांनी धडक कारवाई करत एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला .
अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा यवत पोलिसांनी दिला आहे.
दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे येथील बोरीभडक फाट्यावरून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका इसमाकडे बेकायदेशीर गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईदरम्यान ऋषभ रमेश बडेकर (वय ३०, रा. बडेकरवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीमध्ये त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण २५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी पुणे यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यात लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, बंदुका किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास बंदी असतानाही आरोपीकडे अवैध शस्त्र आढळून आले. त्यामुळे त्याच्यावर संबंधित आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) सह १३५ अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून, तो रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या

मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक मारोती मेटलवाड, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संदीप देवकर, महेंद्र चांदणे तसेच पोलीस कर्मचारी धीरज जाधव, मारुती जाधव, अमोल भुजबळ, प्रतीक जगताप, सचिन गुंड, दिनेश लोणकर आणि विनीत कुऱ्हाडे यांनी सहभाग घेतला.
यवत पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणारे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
