फिरोज सय्यद ( नांदेड जिल्हा प्रतिनिधी )
सिंदखेड : नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार बांधव तसेच शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात अनेक गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढल्या. या उपक्रमाला पत्रकारांनी प्रसिद्धी देत सहकार्य केले, तर पोलीस पाटलांनीही शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उल्लेखनीय सहकार्याबद्दल सिंदखेड पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळे, पत्रकार आणि पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे आणि राजकुमार पडलवार यांनी सण-उत्सवांच्या काळातील आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी आगामी सण-उत्सवही डीजेमुक्त आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहावे, कोणालाही OTP किंवा गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अभिजित जगताप यांनीही नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येकाने दक्ष राहावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी मानले.
यावेळी परिसरातील नागरिक, पोलीस कर्मचारी, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
