संदीप रोमन ( पुरंदर ता. प्रतिनिधी )

पुरंदर जेजुरी : गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक सलोख्याचा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली कर्णकर्कश डीजेचा दणदणाट, ध्वनिप्रदूषण किंवा सार्वजनिक शांततेचा भंग अजिबात खपवून घेतला जाणार नाही. गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत गणेशोत्सव भक्तिभावाने आणि कायद्याच्या चौकटीत साजरा करावा, असे स्पष्ट आवाहन भोर विभाग सासवडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी केले.
जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले होते, तर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलिसांनी गणेश मंडळांना रोखठोक शब्दांत नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. ध्वनिक्षेपकांचा वापर करताना शासनाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादा, वेळेचे निर्बंध आणि सार्वजनिक शांततेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कोणतीही तडजोड न करता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

गणेशोत्सवाच्या काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा ढोल-ताशा, लेझीम, हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश, जनजागृती, आरोग्यविषयक उपक्रम तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबविणाऱ्या मंडळांचे पोलिसांच्या वतीने कौतुक व गौरव करण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, नायब तहसीलदार संदीप पाटील, करविभागाचे बोरकर साहेब व कर्मचारी, नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक योगेश जगताप, नगरसेवक रोहित खोमणे, स्वीकृत नगरसेवक आबा कुदळे, आरोग्य विभागाचे डॉ. प्रसाद साळवे, महावितरण विभागाचे संतोष कर्णवर तसेच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

*उत्सवाच्या नावाखाली गोंधळ चालणार नाही*
जेजुरी हे श्रद्धा आणि उत्सवाचे शहर आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा जपत पार पडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सवाला गालबोट लागेल, नागरिकांना त्रास होईल किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी केले.

*पोलिसांचा रोखठोक इशारा*
परंपरेच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण, नियमभंग अथवा सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. “गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा करा; मात्र कायद्याची चौकट ओलांडू नका. नियम मोडाल तर कारवाई अटळ आहे,” असा स्पष्ट संदेश जेजुरी पोलिसांनी गणेश मंडळांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed