स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
लातूर : अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका घेत मुरूड पोलिसांनी केलेल्या सखोल व शास्त्रोक्त तपासामुळे आरोपीस तब्बल 20 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे अशा गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असून, पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या पोलीस दलाच्या कटिबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
सदर प्रकरणात मुरूड पोलीस ठाणे हद्दीतील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी ऋषीकेश भगवान नरवाडे (वय 21 वर्षे, रा. मसल्लगा, ता. कंधार, जि. नांदेड) याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडितेच्या आजी यांनी दि. 29 मे 2024 रोजी मुरूड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक 184/2024 दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आलेवार, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नागरगोजे, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काटेकोरपणे करण्यात आला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान जिल्हा सरकारी वकील श्री. संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता श्री. मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षाची प्रभावी बाजू मांडली. त्यांना अड. दिव्या वीर व अड. सोमेश्वर बिराजदार यांनी सहकार्य केले. सरकारी पंच, तपासी अधिकारी व वैज्ञानिक पुरावे यामुळे सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे सिद्ध झाली.
सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मा. जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दि. 06 ऑगस्ट 2026 रोजी आरोपीस पॉक्सो कायदा, 2012 अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षे सक्त कारावास व 8,000 दंड अशी शिक्षा सुनावली.
या खटल्याचा प्रभावी पाठपुरावा पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तसेच ट्रायल मॉनिटरिंग सेलचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. मनाळे, पोलीस अंमलदार इम्रान शेख व जी. जी. रायचमले यांनीही न्यायालयीन कामकाजात मोलाचे योगदान दिले.
