नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
यवत (दौंड, पुणे):
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिस स्टेशनच्या वतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी यवत गावातून रुट मार्च (Route March) काढण्यात आला. हा रूट मार्च दुपारी १३:०० ते १८:०० या वेळेत पार पडला.
रूट मार्चचा मार्ग व सहभाग
हा रूट मार्च श्री काळभैरवनाथ चौक, बाजारपेठ, हनुमान मंदिर चौक, गणपती चौक, खांदपी चौक, ब्राह्मण अळी, कदम आळी, उल्का मस्जिद, जिल्हा परिषद शाळा या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आला. यात १ पोलिस निरीक्षक, १ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ४ पोलिस उपनिरीक्षक, २० पोलिस अंमलदार आणि २५ होमगार्ड असे पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

शांतता व मोहल्ला कमिटीच्या बैठका
यवत, केडगाव, पारगाव व नाथाची वाडी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, शांतता व मोहल्ला कमिटी सदस्य, पोलिस पाटील आणि पत्रकारांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला सुमारे ३०० ते ३५० नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त सूचनांनुसार गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या प्रमुख सूचना व मार्गदर्शक सूचना:
सुरक्षा व नियोजन: गणेश मंडपांना आवश्यक परवानग्या घेणे, वाहतुकीस व आपत्कालीन मार्गांना अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. विद्युत व अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना करणे, CCTV यंत्रणा बसवणे, स्वयंसेवक नियुक्त करणे तसेच महिला, बालके व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ध्वनिप्रदूषण व लेझर लाईटवर बंदी: ध्वनिप्रक्षेपकाचा वापर शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत व मर्यादेतच करावा. नागरिक, रुग्णालय, शाळा व ज्येष्ठ नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने मोठ्या आवाजात डीजे वाजवू नये. लेझर लाईट, अत्यंत तीव्र प्रकाशझोत, धोकादायक वाहनप्रदर्शन व असभ्य गाण्यांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
सोशल मीडिया व ॲडमिनची जबाबदारी: सोशल मीडियाद्वारे अफवा, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे संदेश, फोटो, व्हिडिओ प्रसारित करू नयेत. WhatsApp, Telegram, Facebook, Instagram आदी सोशल मीडिया ग्रूपच्या Admin यांनी अशा पोस्टवर तत्काळ नियंत्रण ठेवावे.
बेकायदेशीर कृत्यांवर बंदी: गणेशोत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी वसूल करणे, मद्यपान, जुगार, मटका किंवा अन्य बेकायदेशीर प्रकार करू नयेत. संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

नियमभंगावर कारवाईचा इशारा
उत्सव आनंदाने, नवसाने व सुरक्षिततेने साजरा करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांचे पदाधिकारी व संबंधित व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
