पंकज सरोदे ( महाराष्ट्र प्रतिनिधी )

पुणे  : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील घोडेगाव पोलीस स्टेशन यांनी नागरिकांचा विश्वास जपत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल २ लाख रुपये किमतीचे ११ हरवलेले मोबाईल शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते मे २०२६ या कालावधीत घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक नागरिकांचे मोबाईल हरवले किंवा गहाळ झाले होते. याबाबत संबंधित नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत घोडेगाव पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला.

तपासादरम्यान सायबर सेल पुणे ग्रामीण तसेच Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलच्या सहाय्याने तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणाच्या आधारे वेगवेगळ्या जिल्ह्यांतून एकूण ११ मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

ता. १८ मे २०२६ रोजी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत घोडेगाव पोलिसांचे आभार मानले. नागरिकांचा विश्वास संपादन करत पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे या कारवाईचे विशेष कौतुक होत आहे.

ही संपूर्ण कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीप गिल, मा. अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पोलीस उपनिरीक्षक महेश पवार व पोलीस अंमलदार निलेश तळपे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *