नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये अवैध गर्भलिंग निदानाचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालय दौंड येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन विठ्ठल गुजर यांना केडगाव परिसरात अवैधरित्या गर्भलिंग निदान होत असल्याचा एक व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर प्राप्त झाला होता. संबंधित व्हिडिओची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर हा प्रकार बेकायदेशीर गर्भलिंग निदानाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणी डॉ. गुजर यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 466/2026 अंतर्गत गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 3(अ), 6(ब)(क), 18, 23 आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी म्हणून अण्णासाहेब गिरी, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे यांचे नाव समोर आले आहे. सदर प्रकार 14 मे 2026 रोजी सायंकाळी 5.46 वाजण्याच्या सुमारास केडगाव परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तर हा गुन्हा 20 मे 2026 रोजी पहाटे 12.26 वाजता अधिकृतपणे दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करत असून, प्रकरणातील व्हिडिओची सत्यता, संबंधित व्यक्तींचा सहभाग आणि अवैध गर्भलिंग निदानाचे जाळे याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा हा मुलींचे प्रमाण टिकवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे प्रशासन अत्यंत गांभीर्याने पाहत असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *