नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. :  70281 92140

दौंड : पुणे जिल्ह्यातील पडवी (ता. दौंड) येथील रहिवासी सागर उर्फ अक्षय अरुण टिळेकर यांनी एका प्रलंबित फौजदारी प्रकरणाच्या संदर्भात आपल्यावर सातत्याने दबाव टाकला जात असल्याचा गंभीर दावा केला आहे. संबंधित प्रकरणातून माघार घेण्यासाठी धमक्या दिल्या जात असून मानसिक त्रासही सहन करावा लागत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती पोलीस विभागात कार्यरत असल्याने आपल्या पदाचा व ओळखीचा गैरवापर करून विनाकारण पोलीस ठाण्यात बोलावणे, मानसिक दबाव निर्माण करणे तसेच खोट्या तक्रारी व खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकारी व विविध सक्षम प्राधिकरणांकडे लेखी अर्ज सादर करण्यात आल्याचा दावाही अर्जदाराने केला आहे. तसेच आपल्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

सागर उर्फ अक्षय टिळेकर हे अल्पभूधारक शेतकरी असून, कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची तात्काळ व निष्पक्ष दखल घेऊन आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात राहुल सुभाष शितोळे, रा. पडवी (ता. दौंड, जि. पुणे) व सध्या कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला असून, त्यांच्या विरोधात पदाचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित पोलीस कर्मचारी अथवा पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही पक्षावर अनावश्यक दबाव येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी अर्जदाराने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed