स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )
पुणे : पुणे शहरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारविरोधात महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. परवान्याच्या अटींचे उल्लंघन, आवश्यक परवानग्यांचा अभाव आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
महापालिकेच्या अलीकडील मोहिमेत शहरातील १५४ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार वर टाळेबंदीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नियमांचे गंभीर उल्लंघन आढळलेल्या ३२ आस्थापनांचे परवाने रद्द करण्यात आले असून, विविध त्रुटी आढळलेल्या ६६ संबंधितांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरातील व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून अग्नि सुरक्षा, स्वच्छता, परवाना, बांधकाम नियम आणि इतर आवश्यक अटींची पडताळणी करण्यात आली. ज्या ठिकाणी गंभीर अनियमितता आढळली, त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी सर्व आवश्यक परवानग्या, अग्निसुरक्षा प्रमाणपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी आवश्यक कागदपत्रे आणि परवानग्या अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाची ही मोहीम पुढील काही दिवस अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
