नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

पाटस ( दौंड तालुका ) :  पाटस : येथे परिसरातील नागरिकांच्या व्यायामासाठी आणि विरंगुळ्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्चून उभारलेला नागनाथ तलावाचा जॉगिंग ट्रॅक आज स्वतःच ‘दुरावस्थेत’ पडला आहे. ठेकेदाराचा कामचुकारपणा आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे या ट्रॅकची अक्षरशः दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
  

एका बाजूला शासनाकडून सार्वजनिक सुविधांसाठी कोटींची उधळण केली जाते, तर दुसरीकडे पाटसमध्ये हा पैसा निकृष्ट कामाच्या खाईत लोटला गेला आहे. जॉगिंग ट्रॅकचे काम पूर्ण होऊन काही काळ लोटला असला, तरी आज तिथे चालणेही मुश्कील झाले आहे. ट्रॅकवर पडलेली झाडे आणि तुटलेले संरक्षक कठडे हे काम किती ‘दर्जेदार’ झाले होते, याचे जिवंत पुरावे आहेत.
  

काही दिवसांपूर्वी कचरा जाळण्याच्या नावाखाली लागलेल्या आगीत काही मोठी झाडे जळून खाक झाली होती. या घटनेमागे फुकटची लाकडे चोरून विकण्याचा काही हितसंबंधितांचा डाव होता, हे उघड झाले होते. स्थानिकांनी आवाज उठवल्यामुळे हा डाव उधळला गेला खरा, पण त्यानंतर कापलेली झाडे आणि ओंडके आजही ट्रॅकच्या मध्यभागी पडून आहेत. हे ओंडके आता कुजले असून त्यांना कीड लागली आहे. यामुळे ट्रॅकवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
  

जॉगिंग ट्रॅकचे संरक्षक कठडे काही ठिकाणी तुटले आहेत. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी येथे फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण ट्रॅकवर दिवाबत्तीची (स्ट्रीट लाईट्स) सोय नसल्याने येथे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
  

काम पूर्ण केल्यानंतर देखभाल करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना, बिले लाटून तो गायब झाला आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन यावर चकार शब्द काढायला तयार नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का? जॉगिंग ट्रॅकला ‘वाली’ कोण नाही का? अशा प्रश्नांनी आता पाटसकर संतप्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *