नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो. नं. :  70281 92140

यवत :  समाजातील गंभीर सामाजिक विकृती मानल्या जाणाऱ्या बेकायदेशीर लिंग निदान आणि स्त्री-भ्रूणहत्येच्या प्रकरणावर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत एका महिला डॉक्टरसह दोन जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करून त्याची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली असून केडगाव येथील एका रुग्णालयावर छापा टाकून संबंधित महिला डॉक्टरलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

यवत पोलीस ठाणे आणि विशेष तपास पथक (SIT) यांच्या संयुक्त कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्री-भ्रूणहत्या ही केवळ कायदेशीर गुन्हा नसून मानवी मूल्ये आणि सामाजिक संतुलनाला बाधा पोहोचवणारा गंभीर अपराध असल्याने या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

मुख्य आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड
या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब अण्णा गिरी (वय ४१, रा. केडगाव, ता. दौंड) याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान त्याने स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून गर्भातील बाळाचे लिंग सांगण्याचे काम केल्याची माहिती समोर आली. आरोपी एका पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भवती महिलांचे बेकायदेशीर लिंग निदान करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलांनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांना गर्भातील बाळाचे लिंग सांगत असे. जर गर्भ मुलीचा असल्याचे समजले, तर संबंधित महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी केडगाव येथील रुग्णालयात पाठविले जात असल्याचे उघड झाले आहे.
महिला डॉक्टर अटकेत
मुख्य आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केडगाव स्टेशन परिसरातील समर्थ रोडवरील पार्थ हॉस्पिटल येथे छापा टाकला. रुग्णालयाच्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (वय ६२) यांच्यावर बेकायदेशीर गर्भपात केल्याचा आरोप आहे.

विशेष तपास पथकाने गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे डॉ. गायकवाड यांना यवत पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १९ जून २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोणती कलमे लावण्यात आली?

या गंभीर प्रकरणात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६६/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९३, ९६, ८८ तसेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा (PCPNDT Act) आणि वैद्यकीय गर्भपात अधिनियम (MTP Act) अंतर्गत विविध कलमे लावण्यात आली आहेत.

पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान आणखी काही व्यक्तींचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक राजेंद्र मोरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष तपास पथक (SIT) आणि यवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपास करून ही कारवाई यशस्वी केली.
पोलिसांचा इशारा

पुणे ग्रामीण पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, गर्भातील लिंग निदान करणे आणि त्याआधारे गर्भपात करणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *