सातारा / जि. संपादक अजित काळेल

भुईंज : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 या पोलीस हेल्पलाईन सेवेचा गैरवापर करणाऱ्या एका युवकाविरुद्ध भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि. 04 जून 2026 रोजी सायंकाळी 5.43 वाजण्याच्या सुमारास मौजे पाचवड, ता. वाई येथील कैलास फुड्स परिसरातून आरोपी अक्षय नंदकुमार पिसाळ (वय 21 वर्षे, रा. गोवेदिगर, ता. वाई, जि. सातारा) याने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत डायल 112 हेल्पलाईनवर फोन करून एका व्यक्तीस चाकू मारून ठार केल्याची खोटी माहिती दिली होती.

सदर माहितीची तात्काळ पडताळणी करण्यात आली असता ती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने जाणूनबुजून खोटी माहिती देऊन डायल 112 यंत्रणेचा गैरवापर केल्याचे आढळून आले. याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 180/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 217 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपत्कालीन सेवांचा गैरवापर केल्यामुळे पोलीस यंत्रणेचा वेळ व मनुष्यबळ विनाकारण खर्च होतो तसेच खऱ्या गरजू नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे अशा प्रकारे खोटी माहिती देणाऱ्या अथवा डायल 112 सेवेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा भुईंज पोलिसांनी दिला आहे.

सदर कारवाई मा. निखील पिंगळे सो,  पोलीस अधीक्षक, मा. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, मा. सुनिल साळुंखे उपविभागीय पोलीस अधिकारी वाई यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पृथ्वीराज ताटे, भुईंज पोलीस स्टेशन, डायल 112 ड्यूटी करता असणारे पोलीस शिपाई शिंदे यांनी पूर्ण केली असून  पुढील तपास पोलीस हवालदार ए. जे. सपकाळ करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *