सातारा / जिल्हा संपादक अजित काळेल
वाई : निष्पक्ष, विश्वासार्ह आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून गेली दोन दशके जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाचे मालक-संपादक तसेच संकल्प न्यूज पोर्टल व संकल्प मीडिया समूहाचे प्रमुख अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत पत्रकार अधिस्वीकृती (Accreditation) प्रदान करण्यात आली आहे.
पुणे विभाग पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सातारा जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांच्या हस्ते अशोक इथापे यांना अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आले.
अशोक इथापे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण कार्य केले आहे. ‘संकल्प न्यूज’च्या माध्यमातून त्यांनी विविधता, वाचनीयता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीचा अवलंब करत पत्रकारितेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांना न्याय देणारे वृत्तांकन, महिला सक्षमीकरण, युवकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सदरे आणि सकारात्मक पत्रकारिता ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
परंपरागत पत्रकारितेबरोबरच आधुनिक डिजिटल माध्यमांची ताकद ओळखत त्यांनी ‘संकल्प न्यूज’ पोर्टल आणि ‘संकल्प न्यूज मराठी’ युट्यूब चॅनलची स्थापना केली. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्ह्यातील घडामोडी जनतेपर्यंत वेगाने आणि विश्वासार्हतेने पोहोचवित स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
पत्रकारितेसोबतच शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. ज्ञानसंकल्प अबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर, डीएमआयटी करिअर कौन्सिलिंग सेंटर तसेच संकल्प संगीत साधना केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आणि युवकांना दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. पर्यावरण, ग्रामविकास, शिक्षण, करिअर, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक विषयांवरील विशेषांक, माहितीपट व जनजागृतीपर उपक्रमांत त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे.
पद्मश्री शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त त्यांनी संपादित केलेल्या ‘कलास्पर्श’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले होते. त्यांच्या पत्रकारिता, समाजसेवा आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी अशोक इथापे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ही अधिस्वीकृती त्यांच्या सातत्यपूर्ण आणि निष्ठावान पत्रकारितेची पोचपावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, वाई तालुका मराठी पत्रकार संघ, भुईंज प्रेस क्लब, नगराध्यक्ष अनिल सावंत, पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध सामाजिक-सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी अशोक इथापे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्रकारितेतील निष्ठा, समाजसेवेची कास आणि आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर यांची दखल घेत महाराष्ट्र शासनाने दिलेली ही अधिस्वीकृती अशोक इथापे यांच्या कार्याला मिळालेला सन्मान मानला जात आहे.
