सातारा / संपादक अजित काळेल

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हुमणी कीड नियंत्रणासाठी राबविलेला प्रकाश सापळा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. मौजे पिलाणी, राकुसलेवाडी व आसनगाव परिसरात घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना हुमणी कीडीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

ऊस, भात, भाजीपाला व इतर पिकांच्या मुळांवर आक्रमण करून मोठे नुकसान करणाऱ्या हुमणी कीडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाश सापळा हा अत्यंत प्रभावी आणि पर्यावरणपूरक उपाय असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. प्रात्यक्षिकावेळी खड्ड्यात पाणी व तेल भरून त्याजवळ बल्ब लावण्याची पद्धत दाखविण्यात आली. प्रकाशाकडे आकर्षित होणारे भुंगेरे पाण्यात पडून नष्ट होत असल्याने पुढील अळींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होते.

सहाय्यक कृषी अधिकारी देवराज पवार यांनी सांगितले की, एका भुंगेऱ्यापासून शंभरपर्यंत अळ्या तयार होऊ शकतात. त्यामुळे भुंगेऱ्यांचे नियंत्रण करणे हीच हुमणी नियंत्रणाची प्रभावी गुरुकिल्ली आहे. प्रकाश सापळा कमी खर्चात उभारता येत असल्याने शेतकऱ्यांसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

जयवंत कदम यांच्या शेतात झालेल्या या प्रात्यक्षिकास सरपंच  पोलीस पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत हुमणीमुक्त शेतीसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण आणि उत्पादनवाढीच्या दृष्टीने कृषी विभागाचे हे अभियान ग्रामीण भागात प्रभावी ठरत असून हुमणीमुक्त शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *