नेताजी खराडे (  क्राईम रिपोर्टर )

मो.नं.  70281 92140

यवत, ता. दौंड  :  गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीतून पळ काढणाऱ्या आणि तब्बल चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर यवत पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. आरोपी न्यायालयात सबजेल (चार्जशीट) दाखल करण्यापूर्वीच फरार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

मात्र सातत्यपूर्ण शोधमोहीम आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४७१/२०२५ मध्ये आरोपी मन कंटेश्वर नाम तरपेठे (वय ३०, रा. येल्लूर  विजयवाडा राज्य आंध्रप्रदेश ) यास अटक करण्यात आली होती.

आरोपीला पुढील तपासासाठी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, २४ जानेवारी २०२६ रोजी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी पोलीस अंमलदारांच्या ताब्यात असताना आरोपीने अचानक वाहनाचे दार उघडून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती.

फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. आरोपीच्या नातेवाईकांची, मित्रपरिवाराची तसेच संभाव्य वास्तव्याच्या ठिकाणांची पडताळणी करण्यात आली. मात्र सुरुवातीला आरोपीचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता.

यवत पोलिसांनी हार न मानता तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने तपास सुरू ठेवला. अखेर आरोपी आपल्या मूळ गावी, तेलंगणा राज्यातील एका ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विशेष पथकाने तेथे जाऊन सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

चार महिन्यांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यश आल्याने पोलिस दलात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये यवत पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच तांत्रिक तपास पथकातील अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीचा शोध घेण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे अखेर यवत पोलिसांना यश मिळाले असून या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *