नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथे महावितरण कंपनीच्या अक्षम्य हेळसांड आणि निष्काळजीपणाचा एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोमवार, दि. २२ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास धुमळीचा मळा (केडगाव) येथील वांग्याच्या शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या यश गणेश जगताप (वय-२५) या तरुण शेतकऱ्याचा तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण केडगाव परिसरावर शोककळा पसरली असून, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळेच एका निष्पाप तरुणाचा नाहक बळी गेल्याचा आरोप करत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १३ जून रोजी परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे येथील शेतातील वीजवाहिन्यांच्या तारा तुटून पडल्या होत्या. याबाबत केडगाव येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी दाखल केल्या होत्या. एवढेच नव्हे तर, या ठिकाणी महिनाभरापूर्वीच विजेचे नवीन खांब आणून टाकले होते, मात्र ते उभे करण्याची तसदी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. नागरिकांनी वारंवार विनंती करूनही या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. ९ दिवस उलटूनही तुटलेल्या तारा तशाच पडून राहिल्याने अखेर सोमवार सकाळी औषध फवारणी करत असताना यश जगताप याला या जिवंत तारांचा जोरदार शॉक लागला आणि त्याचा जागीच अंत झाला.

या दुर्दैवी घटनेनंतर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. “घटनेच्या ठिकाणचा विद्युत प्रवाह आधीच बंद करण्यात आला होता, त्यामुळे यशचा मृत्यू महावितरणमुळे झालेला नसून, चौकशी समितीच्या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल,” अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
महावितरणच्या या पळवाटेवर ग्रामस्थांनी आणि मृताच्या नातेवाईकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जर अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार त्या वाहिनीवरील विद्युत प्रवाह बंद होता, तर मग यशला विजेचा तीव्र धक्का लागलाच कसा? असा थेट आणि रोखठोक सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच, संबंधित भागातील वायरमनची तीन-चार दिवसांपूर्वीच बदली झाली असल्याचे सांगून या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, १३ जूनपासून नऊ दिवस तुटलेल्या तारा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिसल्या कशा नाहीत? यामागे नक्की काय गौडबंगाल आहे? अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.

यश जगतापच्या मृत्यूला सर्वस्वी महावितरणचा भोंगळ कारभार आणि अधिकारीच जबाबदार आहेत. या प्रकरणी तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि निष्पाप तरुणाचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेल्या महावितरणच्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी केडगावचे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी केली आहे. दोषींवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
