नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )
मो.नं. : 70281 92140
यवत. ( दौंड तालुका ) : यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संशयितास अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २३ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे यवत परिसरात एक व्यक्ती अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत आदित्य संजय सांगळे (वय २२ वर्षे, रा. दत्तनगर, पाटस रोड, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी सदर शस्त्र जप्त केले.
तपासादरम्यान आरोपीने हे पिस्तूल जिल्हाधिकारी, पुणे यांच्या आदेशाचे उल्लंघन करून स्वतःच्या ताब्यात ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर पिस्तूल हे शस्त्र कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याचेही स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप सुरेश देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला असून, त्याच्याकडे हे शस्त्र कुठून आले, त्याचा वापर कोणत्या हेतूसाठी केला जाणार होता आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, तपासादरम्यान आरोपीविरुद्ध यापूर्वीही शारीरिक दुखापतीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विकास ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप तानसाळकर, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेठकवाड, पोलीस हवालदार रांगे देवकते, संदीप देवकर, गणेश कर्वे, महेंद्र बांगे, तसेच पोलीस कर्मचारी शिवज जाधव, मारोती बारोटे, ओमकार गुंजाळ, सचिन गुंड आणि मोहन भावरवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
