नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य )
मो.न. : 70281 92140
यवत परिसरात दारूबंदी कारवाई; 23 हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत परिसरात पोलिसांनी दारूबंदीविरोधात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवत पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा रजिस्टर क्रमांक 312/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ख), (ग), (च) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस हवालदार रामदास ज्ञानदेव जगताप यांनी तक्रार दिली आहे. आरोपी चेतन लक्ष्मण गुडदावत (रा. नाथाचीवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10.10 वाजण्याच्या सुमारास, मौजे यवत येथील रायकर वस्ती परिसरातील माटोबा तलावाजवळ पोलिसांनी छापा टाकला. या वेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीद्वारे दारू तयार करत असल्याचे उघड झाले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.
या कारवाईत पोलिसांनी 500 लिटर कच्चे रसायन, 35 लिटर तयार गावठी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी वापरली जाणारी ॲल्युमिनियमची भांडी व इतर साहित्य असा एकूण 23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही दारू मानवी आरोग्यास अत्यंत घातक आणि विषारी असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खोमणे करीत असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर दारू व्यवसायावर पोलिसांचा धडाकेबाज बडगा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
“शोध सत्याचा, त्याला वास्तवाची धार” — महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
