नेताजी खराडे ( क्राईम रिपोर्टर )

मो.नं. : 70281 92140

यवत (पुणे), दि. ८ जुलै : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि यवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि चारचाकी वाहनासह एकूण ९ लाख ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच शस्त्रास्त्र अधिनियमांतर्गत (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रास्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या तसेच अशा शस्त्रांची बाळगणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भांडगाव परिसरात संशयित व्यक्ती अवैध गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे आणि एक बोलेरो चारचाकी वाहन असा ९,७६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :
गणेश शंकर ममारे (वय २९ वर्षे)
सूरज संजय शेलार (वय २६ वर्षे)
रोहित प्रमोद भुजबळ (वय २४ वर्षे, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे)

प्राथमिक तपासात आरोपींकडे मिळालेली शस्त्रे नेमकी कोठून आणली, त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर, यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed