स्मिता बाबरे ( मुख्य संपादिका )

लातूर : नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने लातूर जिल्ह्यात धडक कारवाई केली आहे. २२ ऑगस्ट २०२६ रोजी लातूरमधील मुरुड आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून जुगार व मटका अड्ड्यांवरून एकूण २६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल १९,०८,०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मुरुड बायपास येथे जुगार अड्ड्यावर कारवाई
मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरुड बायपासवरील दत्त मंदिराजवळ असलेल्या रामेश्वर सवाशे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पथकाने पहिली कारवाई केली. या कारवाईत:
ताब्यात घेतलेले आरोपी: १९ इसम
जप्त साहित्य: ३१,७४० रुपयांची रोख रक्कम, १९ मोबाईल, २ चारचाकी वाहने आणि १० मोटारसायकली असा एकूण १७,८१,७४० रुपयांचा मुद्देमाल.
याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २९५/२०२६ नुसार कलम ४ व ५ महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ बाबासाहेब खोपे करत आहेत.


शिवाजीनगर हद्दीत मटका बुकीवर छापा
दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दयानंद कॉलेज गेटजवळील रोड लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या मटका बुकीवर कारवाई करण्यात आली.


ताब्यात घेतलेले आरोपी: ७ इसम
जप्त साहित्य: २०,३९० रुपयांची रोख, ६० हजार रुपये किमतीचे ७ मोबाईल आणि ४५,९०० रुपयांचे संगणक साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१९/२०२६ नुसार कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम ४(अ)(ग) महाराष्ट्र राज्य लॉटरी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोहेकॉ अनंत सुधोडकर करत आहेत.

एकूण जप्त मुद्देमाल
दोन्ही कारवायांतून पोलिसांनी एकूण ५२,१३० रुपयांची रोख रक्कम, २६ मोबाईल फोन, २ चारचाकी वाहने, १० मोटारसायकली आणि संगणक साहित्य असा एकूण १९ लाख ०८ हजार ०३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ गणेश राठोड, पोहेकॉ संदिप वाघाडे आणि पोहेकॉ गजानन ढवरे यांच्या पथकाने पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

‘खबर’ हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन
नागरिकांना परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ९१ ५० १०० १०० (9150100100) ही ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली आहे. नागरिकांनी निर्भयपणे या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed